विशेष मोहिमेत ११६ ठिकाणांची तपासणी; शस्त्र जप्त, प्रतिबंधक कारवाईसह विविध गुन्हे दाखल
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने बार, हॉटेल व धाब्यांवर एकाचवेळी विशेष सर्च ऑपरेशन राबवून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली.रात्रीच्या वेळी बार व धाब्यांमध्ये गुन्हेगारी टोळ्या एकत्र येऊन गुन्ह्यांचे नियोजन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली २ मार्च रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन विशेष पथके स्थापन करण्यात आली होती.
या मोहिमेत जिल्हाभरातील बार, २१३ हॉटेल व धाब्यांवर अचानक छापे टाकून एकूण दारूबंदी अंतर्गत ११६ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एका ठिकाणी एनडीपीएस अंतर्गत कारवाई, दारूबंदी कायद्यांतर्गत ११ प्रकरणे नोंदविण्यात आली. तसेच एका इसमाकडून तलवार जप्त करण्यात आली तर दोन अनधिकृत हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच,त्यांना निष्कासित करण्यात आले आहे.याशिवाय ४७ इसमांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई (कलम ११२/११७ प्रमाणे) करण्यात आली. इतर कारवाईत ४-३३/डब्ल्यू प्रमाणे प्रकरणे, मोटार वाहन कायद्यांतर्गत ५ गुन्हे, तसेच एकावर ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ प्रकरण दाखल करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत (जळगाव परिमंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या पथकांनी ही मोहीम यशस्वीरीत्या राबवून उल्लेखनीय कामगिरी बजावली.

