अधिकृत माहिती देण्यासाठी फक्त शासनमान्य दोनच माध्यमांचा वापर करण्याचे निर्देश
मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो पूर्णतः बनावट व अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अर्जांवर विश्वास ठेवू नये तसेच वैयक्तिक माहिती शेअर करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात नागरिकांनी ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे. ही माहिती देण्यासाठी शासनाने केवळ दोन अधिकृत माध्यमे निश्चित केली आहेत. त्यानुसार, नागरिकांनी स्व-नोंदणीसाठी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरावी. फॉर्म सबमिट केल्यानंतर प्राप्त होणारा ‘SE ID’ पुढील प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाणार आहे.याशिवाय, दि. १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत अधिकृत प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन थेट माहिती संकलित करणार आहेत. त्या वेळी नागरिकांना प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येणार आहे.
दरम्यान, सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या अनधिकृत अर्ज, लिंक किंवा अनोळखी व्यक्तींमार्फत वैयक्तिक माहिती देण्याचे टाळावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. नागरिकांनी केवळ अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

