Friday, May 29, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याविद्यापीठाच्या वेशभूषा नियमांवरून नवा वाद; दिगंबर जैन मुनींना प्रवेश नाकारल्याने संताप

विद्यापीठाच्या वेशभूषा नियमांवरून नवा वाद; दिगंबर जैन मुनींना प्रवेश नाकारल्याने संताप

पुणे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एका संवेदनशील घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, दिगंबर जैन पंथाचे श्रद्धेय मुनी अक्षय सागरजी महाराज यांना विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोखण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील एका अधिकृत चर्चासत्रासाठी निमंत्रण देण्यात आले असतानाही पारंपरिक दिगंबर वेशभूषेमुळे प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप होत असून, या घटनेमुळे जैन समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील शैक्षणिक कार्यक्रमासाठी मुनी अक्षय सागरजी महाराज यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ते विद्यापीठाच्या मुख्य गेटवर पोहोचल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. विद्यापीठ परिसरात औपचारिक कार्यक्रमांसाठी ठरावीक वेशभूषा नियम लागू असल्याचे कारण यावेळी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर जैन समाजातील विविध संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. दिगंबर परंपरा ही जैन धर्मातील अत्यंत पवित्र आणि त्यागमय जीवनपद्धती मानली जाते. अशा परंपरेची पूर्ण माहिती असताना मुनींना निमंत्रण देऊन नंतर प्रवेश नाकारणे हा धार्मिक भावनांचा अवमान असल्याचा आरोप समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटू लागले असून विद्यापीठ प्रशासनावर विविध स्तरांतून टीका होत आहे. धार्मिक परंपरांचा सन्मान राखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाने सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही जैन समाजातील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यापीठ प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि पुढील काळात या वादावर कोणता तोडगा काढला जाणार, याकडे राज्यातील शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या