बोदवड | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील मौजे वराड बु. येथे गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, तहसीलदार सपकाळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुढाकाराने सुमारे ६० शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.शेतरस्त्याच्या समस्येमुळे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात शेतकरी वारंवार तहसील कार्यालयात जाऊन पाठपुरावा करत होते. अखेर तहसीलदार सपकाळे साहेब यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत संबंधित पक्षांमध्ये मध्यस्थी केली. रस्ता अडविणाऱ्या संबंधितांशी चर्चा करून कोणताही वाद निर्माण न होता शेतरस्ता मोकळा करून देण्यात आला.
यावेळी शेतकरी सोनू निना बेलदार यांनीही सर्व शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत आपल्या शेतातून रस्ता उपलब्ध करून दिला. ग्रामपंचायत सरपंच अजयसिंग पाटील यांनी समन्वयाची भूमिका बजावत प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.या प्रसंगी अरुण मोझे, शुभम पाटील, बदलखा वंजारी, देविदास आवटे, सुभाष मोझे, संभाजी पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. तसेच पोलीस कर्मचारी, ग्रामसेवक चौधरी साहेब, तलाठी कल्पना पगरुत मॅडम, सर्कल बडगुजर मॅडम, मोजणी अधिकारी, कोतवाल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटल्याने शेतकरी बांधवांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

