भुसावळ तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई; चालकावर कारवाईची प्रक्रिया सुरू
वरणगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत सुमारे ३ ब्रास अवैध मुरूम वाहून नेणारा डंपर जप्त केला. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून महसूल प्रशासनाने अशा प्रकारच्या कारवायांना अधिक गती देण्याचे संकेत दिले आहेत.महसूल विभागाला तळवेल परिसरातून एमएच १९ सीएक्स ६७११ क्रमांकाचा डंपर अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार महसूल पथकाने सापळा रचून संबंधित वाहन अडविले. तपासणीदरम्यान डंपरमध्ये सुमारे ३ ब्रास गौण खनिज मुरूम अवैधरित्या वाहून नेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी चालक सतीश गोपाळ कोळी (रा. वझरखेडा) याच्याकडून डंपर ताब्यात घेण्यात आला असून वाहनाचे मालक अनिकेत इंगळे (रा. वझरखेडा) असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. संबंधितांकडे गौण खनिज वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व वैध कागदपत्रे नसल्याने महसूल विभागाने वाहन जप्त करून महसूल नियमांनुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.ही कारवाई भुसावळ तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव मंडळ अधिकारी रजनी तायडे, पोलीस उपनिरीक्षक जैन, तसेच महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी मनोज म्हस्के, सुधाकर शिंदे, यासीन पिंजारी, प्रशांत ठाकूर आदींच्या उपस्थितीत पार पडली.
दरम्यान, अवैध उत्खनन व गौण खनिज वाहतुकीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू व गौण खनिज माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.