Monday, July 27, 2026
police dakshta logo
Homeक्राईममुक्ताईनगरात गुटखा राज कायम?; बाहेरगावच्या वाहनांवर कारवाई, शहरातील अवैध विक्रीकडे दुर्लक्ष असल्याचा...

मुक्ताईनगरात गुटखा राज कायम?; बाहेरगावच्या वाहनांवर कारवाई, शहरातील अवैध विक्रीकडे दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर शहरात प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील विविध भागांत प्रतिबंधित गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने पोलिस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अधूनमधून बाहेरगावाहून गुटखा वाहतूक करणाऱ्या काही वाहनांवर कारवाई केली जात असली, तरी शहरातील स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या अवैध विक्रीच्या जाळ्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा कारवाया केवळ औपचारिक स्वरूपाच्या ठरत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.पूर्णाड फाटा परिसरात रात्रंदिवस पोलिस गस्त असल्याचा दावा केला जात असतानाही प्रतिबंधित गुटख्याची शहरात आवक-जावक सुरूच असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कडक गस्तीच्या पार्श्वभूमीवरही प्रतिबंधित गुटखा शहरात पोहोचतो कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, काही नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर आरोप करत या संदर्भात पुरावे असल्याचा दावा केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून त्याबाबत स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मुक्ताईनगर शहरातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध व्यापक मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) तसेच पोलिस निरीक्षक (PI) यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, “बाहेरगावच्या वाहनांवर कारवाई करून प्रशासन आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचे दाखवत आहे का? आणि शहरातील अवैध गुटखा विक्रीवर कठोर कारवाई कधी होणार?” असा सवाल मुक्ताईनगरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या