Saturday, August 1, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणतरसोद बोगद्याजवळील पाणी साचण्याच्या समस्येवर संताप; लोकप्रतिनिधींकडून नशिराबाद टोल नाका काही काळ...

तरसोद बोगद्याजवळील पाणी साचण्याच्या समस्येवर संताप; लोकप्रतिनिधींकडून नशिराबाद टोल नाका काही काळ बंद, हायवे प्रशासनाविरोधात जोरदार निषेध!

‘रस्त्यांच्या समस्या सोडवा, अन्यथा टोल वसुली थांबवा’: लोकप्रतिनिधींचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना आज तातडीने घटनास्थळी हजर राहण्याचे दिले आदेश.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील तरसोद बोगद्याजवळील सर्व्हिस रोडवर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुडघ्यापासून ते काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचल्याने वाहनचालक, विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवरून संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांसह शुक्रवारी (दि. ३१ जुलै) रात्री नशिराबाद टोल नाक्यावर धडक देत काही काळासाठी टोल वसुली बंद पाडली आणि हायवे प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदविला. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या कायम असून ग्रामस्थांकडून वारंवार पाठपुरावा करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

नागरिकांचा रोष; लोकप्रतिनिधींनाच धरले जबाबदार.
पावसामुळे निर्माण झालेल्या या समस्येमुळे नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली. अनेक नागरिकांकडून नगरपरिषद व लोकप्रतिनिधींना जबाबदार धरले जात असले, तरी प्रत्यक्षात संबंधित रस्ता व सर्व्हिस रोडची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (NHAI) आहे. त्यामुळे अधिकार नसतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अनेक अपघात, वाहने बंद; नागरिकांचे हाल.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तरसोद बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यातून मार्ग काढताना अनेक दुचाकी वाहने बंद पडली असून किरकोळ अपघातांच्या घटनाही घडल्याची माहिती मिळाली आहे. परिणामी वाहनचालकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विद्यार्थी, कर्मचारी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय.
भुसावळ–सुनसगाव मार्गे मलकापूरकडे जाणारा हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. परिसरात पेट्रोल पंप, शाळा, महाविद्यालय तसेच आयटीआय संस्था असल्याने दररोज हजारो विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून अपघाताचा धोका वाढला आहे.या मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसही नियमित धावत असतात. मात्र रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे काही बसेस पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी आणि कामगारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

टोल नाक्यावर धडक; काही काळ वसुली बंद.
हायवे प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक बापू बोढरे आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद रंधे यांनी नागरिकांसह ३१ जुलै रोजी रात्री सुमारे ९.४० वाजता नशिराबाद टोल नाक्यावर धडक दिली.यावेळी त्यांनी काही काळासाठी टोल वसुली बंद पाडून वाहनांना विनाशुल्क मार्गस्थ केले. “जोपर्यंत नशिराबाद टोलच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत, तोपर्यंत टोल वसुली करू नये,” अशी ठाम मागणी लोकप्रतिनिधींनी केली. यावेळी नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांशी संपर्काचा प्रयत्न निष्फळ.
लोकप्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी येऊन चर्चा करण्यासाठी वारंवार संपर्क साधला. मात्र अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न देता फोन स्विच ऑफ केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे संताप अधिकच वाढला.

मंत्री गिरीश महाजन यांना माहिती; जिल्हाधिकाऱ्यांचे हस्तक्षेप.
घटनाक्रमाची माहिती लोकप्रतिनिधींनी दूरध्वनीद्वारे मंत्री गिरीश महाजन यांना दिली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष योगेश पाटील, लालचंद पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. तसेच संबंधित विभागातील सर्व अधिकाऱ्यांना दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून समस्या पाहण्याचे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली.

स्मरणपत्रांनंतरही एनएचएआयची दखल नाही; नशिराबाद परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील समस्या कायम, नागरिकांमध्ये तीव्र संताप

नशिराबाद नगरपरिषद हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील विविध गंभीर समस्यांबाबत वारंवार निवेदने आणि स्मरणपत्रे देऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. नगरपरिषदेकडून यापूर्वी ६ एप्रिल २०२६ रोजी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले होते. त्यानंतर अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला असून १० जुलै २०२६ रोजी पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. मात्र आजतागायत कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू झाले नसल्याचा आरोप नशिराबाद नगरपरिषद नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.
नगरपरिषदेकडे नागरिकांकडून सातत्याने लेखी व तोंडी तक्रारी प्राप्त होत असल्याने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यात आले आहे. नशिराबाद शहरात प्रवेशासाठी काझी पेट्रोल पंपाजवळ अंडरपास, तरसोद उड्डाणपूल ते नशिराबाद टोल प्लाझापर्यंत रोडलॅम्पद्वारे प्रकाश व्यवस्था, महालक्ष्मी मंदिर चौफुली येथे सुरक्षिततेसाठी आवश्यक स्पीड नियंत्रण उपाययोजना, महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड, तरसोद फाटा ते जळगाव खुर्ददरम्यान प्रवाशांसाठी निवारा शेड तसेच चौबे पेट्रोल पंप परिसरासह विविध ठिकाणी सर्व्हिस रोडवर पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या प्रमुख मागण्या नगरपरिषदेकडून करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील समस्या तातडीने सोडविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरीदेखील एनएचएआय प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत असून, संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.या स्मरणपत्राच्या प्रती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. तरीही प्रत्यक्ष कामांना सुरुवात न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, एनएचएआयने यापुढे विलंब न करता सर्व प्रलंबित कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.

कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी.
तरसोद बोगद्याजवळील सर्व्हिस रोडवर पावसाळ्यात दरवर्षी पाणी साचत असल्याने ही समस्या आता कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करून रस्त्याची दुरुस्ती करावी. अन्यथा समस्या सुटेपर्यंत नशिराबाद टोल नाक्यावर टोल वसुली बंद ठेवण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या