जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- असोदा–मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे अंडरपास पावसाळा सुरू झाल्यापासून पाण्याखाली गेला होता. दोन ते तीन दिवसांपूर्वी खासदार स्मिता वाघ या पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी आल्या असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रेल्वे अंडरपासमधील साचलेले पाणी तातडीने बाहेर काढण्याचे निर्देश दिले होते.
त्यांच्या निर्देशानंतर अंडरपासमधील पाणी काढण्यात आले. मात्र, आजपर्यंत अंडरपास वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसून तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, असोदा शिवारातील सुमारे 250 ते 300 शेतकऱ्यांची शेती रेल्वे अंडरपासच्या पलीकडील बाजूस आहे. अंडरपास बंद असल्यामुळे त्यांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. परिणामी मशागत, पीक संरक्षण, खत फवारणी आणि इतर शेतीची कामे रखडली असून यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे.शेतकऱ्यांचा आरोप आहे की, संबंधित कंत्राटदाराने फ्लेवर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी पाण्याचा निचरा करणारी मोरी बंद केली. हे काम उन्हाळ्यात पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र मुदत संपूनही अंडरपास बंदच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.या अंडरपासचे काम बी. एन. अग्रवाल यांनी घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, आमच्या प्रतिनिधींनी संबंधितांकडे संपर्क साधला असता, “या कामाशी माझा काहीही संबंध नाही. हे काम कोणाचे आहे याची मला माहिती नाही,” असे उत्तर देण्यात आले.
यामुळे संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून तातडीने अंडरपास वाहतुकीसाठी खुला करावा, शेतकऱ्यांना शेतीपर्यंत जाण्याचा मार्ग उपलब्ध करून द्यावा, तसेच यंदाचा हंगाम बाधित झाल्यास नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने प्रशासनाकडे केली आहे