वेळीच अग्निशमन दल दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली; गोसेवकांकडून चारा दानाचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- श्रीक्षेत्र कुंडलेश्वर येथील सदगुरू झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानच्या अंतर्गत चालणाऱ्या भगवान श्रीकुंडलेश्वर गोशाळेतील चाऱ्याच्या गोडाऊनला शुक्रवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. कडाक्याच्या उन्हामुळे ही आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या आगीत मोठ्या प्रमाणावर चारा जळून खाक झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १०० आयशर इतका चारा जळाल्याने अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच गावातील तरुण, संस्थेचे सेवेकरी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.दरम्यान, नशिराबाद नगरपालिकेला माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, उरलेला चारा सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने मदतकार्य राबविण्यात आले.वेळीच उपाययोजना झाल्यामुळे आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. संबंधित गोशाळेत सुमारे ३०० ते ३५० गायी असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याचे नुकसान झाल्याने गायींच्या पालनपोषणासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोशाळेच्या वतीने दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत गायींसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मदत इच्छुकांनी संस्थेशी थेट संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

