अकोला | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अकोला येथील सौ. नीता यशवंत वायकोळे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. डॉक्टर मणीभाई देसाई प्रतिष्ठान, नीती आयोग भारत सरकार, एमएसएमई मंत्रालय (उद्यम) संलग्नित संस्था तसेच राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला.
पुणे येथील सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात 27 एप्रिल 2026 रोजी झालेल्या समारंभात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे, खादी व ग्रामोद्योग मंत्री रविंद्र साठे आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.सौ. वायकोळे या महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या महिला उपाध्यक्ष (विदर्भ विभाग) असून, दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला यांच्या सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. गरजू व अनाथ मुलामुलींना मदत, दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य तसेच महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत.आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था ‘रॉबिन हूड आर्मी’च्या माध्यमातून त्या ज्ञानदान, अन्नदान व वस्त्रदान उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतात. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव हे त्यांचे मूळ गाव असून, राज्यातील विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच त्या सकल लेवा महिला मंडळ, भुसावळ यांच्या अधिकृत सदस्य आहेत.
पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सौ. वायकोळे यांनी कुटुंबीय, सहकारी व संबंधित संस्थांचे आभार मानले. त्यांच्या सामाजिक कार्यात पती यशवंत वायकोळे, मुलगा कुशल, सून उर्मी, मुलगी राजश्री, जावई गिरीश बऱ्हाटे, भाची अमृता पाटील, पुतण जावई डॉ. दिपक लोखंडे तसेच अन्य नातेवाईक व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच रॉबिन हूड आर्मी अकोला टीम व दिव्यांग सोशल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विशाल कोरडे यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.भविष्यातही निस्वार्थ भावनेने समाजसेवा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

