‘माझा गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत जनजागृती रॅली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मृत्यूनंतरही आपले अवयव इतरांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण निर्माण करू शकतात, या मानवतावादी संदेशातून प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबादच्या वतीने अवयवदान दिनानिमित्त गावातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. राज्य शासनाच्या ‘माझा गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत आयोजित या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते व डॉ. अमन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोठे बळ दिले.हातात माहितीपत्रके व आकर्षक पोस्टर्स घेऊन नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘अवयवदान—श्रेष्ठ दान’, ‘चला अवयवदानाचा संकल्प करूया, मानवतेचे ऋण फेडूया’ अशा घोषणा देत गावातील नागरिकांमध्ये जनजागृती केली. अवयवदानाबाबत असलेल्या गैरसमज, भीती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
रॅलीच्या सांगता सभेत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते व डॉ. अमन पटेल यांनी अवयवदानाबाबत शास्त्रीय माहिती देत नागरिकांना या मानवतावादी चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनीही अवयवदानाबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.रॅलीचे शिस्तबद्ध संचलन आरोग्य सेवक दीपक तायडे, सुनील ढाके, संदेश महाजन व वासुदेव पाटील यांनी केले. तांत्रिक बाजू प्रयोगशाळा तंत्रज्ञ नीलिमा येलगिरे व विजय सपकाळे यांनी सांभाळली. रॅलीदरम्यान वाहतूक व इतर व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी १०२ रुग्णवाहिका चालक राजाराम पाचपांडे तसेच १०८ रुग्णवाहिका चालक जीवन शिरसाठ व बापू मराठे यांनी सहकार्य केले. अवयवदानासारख्या संवेदनशील विषयावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राबविण्यात आलेल्या या प्रभावी जनजागृती उपक्रमाचे लोकप्रतिनिधी, नागरिक व परिसरातून कौतुक करण्यात आले.