नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील सुनसगाव फाट्याजवळ असलेल्या मंगलमूर्ती लॉन येथे श्री श्याम परिवार, जळगाव-नशिराबाद यांच्या वतीने आयोजित भव्य श्याम संकीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या धार्मिक कार्यक्रमाला नशिराबादसह जळगाव परिसरातील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून बाबा श्याम यांच्या दर्शनाचा लाभ घेतला.कार्यक्रमात मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील सुप्रसिद्ध भजन गायक कान्हा व्यास यांनी आपल्या सुमधुर गायकीतून विविध भक्तिगीते आणि श्यामभजने सादर केली. त्यांच्या ओजस्वी सादरीकरणामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. भजनांच्या सुरावटींनी संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला होता.
कार्यक्रमादरम्यान ‘हरे का सहारा, बाबा श्याम हमारा’ या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. अनेक भाविकांनी भजनांच्या तालावर भक्तिभावाने नृत्य करत आपल्या श्रद्धेची अभिव्यक्ती केली. संपूर्ण संकीर्तनात उत्साह, भक्ती आणि अध्यात्मिक आनंदाचा संगम अनुभवायला मिळाला.सोहळ्यासाठी उभारण्यात आलेला आकर्षक मंडप तसेच फुलांनी सजविलेला बाबा श्याम यांचा भव्य दरबार भाविकांच्या विशेष पसंतीस उतरला. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, शिस्तबद्ध नियोजन आणि स्वयंसेवकांची तत्पर सेवा यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.
या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री श्याम परिवार, जळगाव, नशिराबाद आणि अण्णा नगर येथील पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या अखेरीस महाआरती करण्यात आली तसेच उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या संगीतमय भक्ती सोहळ्याने नशिराबाद परिसरात अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण केले. अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक ऐक्य अधिक बळकट होत असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

