रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रावेर विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाप्रमुखपदी गजानन निळे (सर) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार झालेल्या या नियुक्तीमुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या अनेक दशकांपासून पक्षाशी निष्ठावान राहून कार्य करणाऱ्या निळे यांना या पदाच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. १९८८ पासून सक्रिय असलेले निळे यांनी संघटनात्मक पातळीवर सातत्याने काम करत पक्षवृद्धीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. जळगाव जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला. विशेषतः २००२ ते २००५ दरम्यान शिक्षणसेवक म्हणून रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला होता.राजकीय क्षेत्रात त्यांनी २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत तळवेल-हतनूर गटातून उमेदवारी देत प्रभावी उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे पारंपरिक राजकीय समीकरणांना आव्हान निर्माण झाले होते.सामाजिक क्षेत्रातही निळे सक्रिय असून महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ तसेच मल्हार सेनेच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवत आहेत. मल्हार सेना जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी समाज संघटनावर भर दिला आहे. फैजपूर येथील सतपंथ ट्रस्टकडून ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
सध्या चिनावल येथील नूतन माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले निळे यांचा भुसावळ, यावल आणि रावेर या तालुक्यांमध्ये व्यापक संपर्क आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेला या भागात नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

