Monday, April 27, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव विधान परिषद जागेवरून महायुतीत तणाव; शिवसेनेचा ठाम दावा, भाजप सावध

जळगाव विधान परिषद जागेवरून महायुतीत तणाव; शिवसेनेचा ठाम दावा, भाजप सावध

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची स्पष्ट भूमिका; जागावाटपात अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वाकडे

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जळगाव विधान परिषद जागेवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही जागा परंपरेने शिवसेनेच्या वाट्याची असल्याचा ठाम दावा करत ती पुन्हा पक्षालाच मिळावी, अशी भूमिका जाहीरपणे मांडली आहे.

या मतदारसंघात पूर्वी सलग दोन कार्यकाळ शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते, याची आठवण करून देत पाटील यांनी ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आधार घेत आपला दावा मजबूत केला. मात्र, अलीकडील दोन निवडणुकांत भाजपने या जागेवर विजय मिळवला असल्याने सध्याच्या राजकीय समीकरणात दोन्ही पक्षांचे बळ जवळपास तोलामोलाचे मानले जात आहे.महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांना आता वेग आला असून, जळगावची जागा शिवसेनेला देण्याबाबत राज्यस्तरावर ठोस पाठपुरावा केला जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावरच होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था गटातील हा मतदारसंघ असल्याने नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे संख्याबळ निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील संघटनशक्ती, गटबाजी आणि राजकीय संबंध यांचा निकालावर मोठा प्रभाव पडणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.याचदरम्यान, मंत्री पाटील यांच्या सुपुत्र प्रताप पाटील यांचे नाव पुढे येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शहरात झळकलेल्या बॅनरमुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चांना अधिक हवा मिळाली असून, या घडामोडींमुळे महायुतीतील समीकरणे आणखी गुंतागुंतीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या