शंकरा आय हॉस्पिटल व श्री स्वामी समर्थ केंद्राचा संयुक्त उपक्रम; ग्रामीण भागातील गरजूंना मोठा दिलासा
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सहकार्याने आणि शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.शिबिरात अनुभवी नेत्रतज्ज्ञ डॉ.चंदन चौधरी आणि डॉ. गौरव तायडे यांनी सुमारे १२० नागरिकांची सखोल नेत्रतपासणी केली. तपासणीनंतर २५ ते ३० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात आले असून, त्यांच्यावर लवकरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार करण्यात येणार आहेत.रुग्णांसाठी तपासणीपासून ते शस्त्रक्रिया, प्रवास, निवास व भोजनाची सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा मोठा लाभ झाला. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक गणेश चव्हाण तसेच श्री स्वामी सेवेकरी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी दर महिन्याच्या चौथ्या रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत नियमित नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच संगणकाच्या सहाय्याने डोळ्यांची व चष्म्याच्या नंबरची तपासणीही करण्यात येणार आहे.
अंधत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असून, “दृष्टी हीच खरी संपत्ती” हा संदेश देणारे हे शिबिर परिसरात कौतुकास पात्र ठरत आहे.


