जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महसूल विभागातील चौकशी प्रकरण निकाली काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी आणि त्यांच्या सांगण्यावरून रक्कम स्वीकारणाऱ्या खासगी व्यक्तीविरुद्ध नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरोधात शेतातील कथित अवैध खोदकामाबाबत स्थानिक नागरिकांनी महसूल विभागासह अन्य कार्यालयांकडे तक्रारी दिल्या होत्या. संबंधित चौकशी अनुकूलरीत्या बंद करण्यासाठी मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांनी सुरुवातीला एक लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगितले जाते. चर्चेनंतर ही रक्कम पन्नास हजारांवर निश्चित करण्यात आली होती.तक्रारदाराने याबाबत नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार मंडळ अधिकारी देवरे यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम खासगी व्यक्ती सुरेंद्र प्रल्हाद अहिरे याच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयाबाहेर उभारण्यात आलेल्या सापळ्यात अहिरे हा पन्नास हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडला. त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत नाशिक एसीबीचे सापळा अधिकारी राहुलकुमार नाईक, हवालदार प्रफुल्ल माळी आणि विलास निकम यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.

