जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील निमखेडी रोड परिसरात उघडकीस आलेल्या कुंटणखाना प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सुटका केलेल्या महिलांपैकी एक महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले असून, ती बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे जळगावात राहत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.निमखेडी रोडवरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर २१ मे रोजी पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईनंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सागर सोनवणे आणि सीमा उर्फ कविता मोरे यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित महिलांना पुनर्वसनासाठी आशादीप संस्थेत हलविण्यात आले.
दरम्यान, चौकशीदरम्यान एका महिलेची माहिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. सुरुवातीला संबंधित महिलेने स्वतःची ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त करून तांत्रिक तपासणी केली तसेच बायोमेट्रिक पडताळणी केली असता तिच्याकडील आधारकार्ड बनावट असल्याचे उघड झाले.सखोल चौकशीत ही महिला मूळची बांगलादेशातील खुलना येथील रहिवासी असून तिचे नाव जाकिया अबुल काहेर फोकर (वय २८) असल्याचे समोर आले. या प्रकरणामुळे मानवी तस्करी, बनावट ओळखपत्रे आणि आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा संशय व्यक्त केला जात आहे.
ही महिला भारतात कशा मार्गाने दाखल झाली, तिला कोणाची मदत मिळाली आणि यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास जळगाव तालुका पोलीस करीत आहेत.

