मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- श्री संत मुक्ताबाईंचे मूळ समाधीस्थळ असलेल्या कोथळी येथील श्री संत मुक्ताबाई पुरातन मंदिराच्या नामफलकावर ‘श्रीक्षेत्र मुक्ताईनगर’ असा उल्लेख करण्यात आल्याने कोथळी ग्रामस्थांसह भाविक भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंदिराचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेता नामफलकावर पूर्वापार सुरू असलेले ‘श्रीक्षेत्र कोथळी’ हे नाव कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
श्री संत मुक्ताबाई या संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या धाकट्या भगिनी होत. त्यांचे मूळ समाधीस्थळ कोथळी येथे असल्याची ऐतिहासिक नोंद असून हे स्थान संत मुक्ताबाईंची पावन भूमी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. तसेच संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यालाही मोठ्या प्रमाणात धार्मिक महत्त्व आहे.मात्र, मंदिर परिसरात नव्याने लावण्यात आलेल्या नामफलकावर ‘श्रीक्षेत्र मुक्ताईनगर’ असा उल्लेख करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. मूळ मंदिर व समाधीस्थळ कोथळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असताना गावाचे नाव वगळून दुसरा उल्लेख करणे म्हणजे कोथळीच्या ऐतिहासिक ओळखीवर अन्याय असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.भाविक व ग्रामस्थांच्या मते, मंदिराच्या नामफलकावर ‘श्रीक्षेत्र कोथळी, ता. मुक्ताईनगर’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. परंपरा, इतिहास आणि धार्मिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी संबंधितांनी स्वतः पुढाकार घेऊन योग्य दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करण्यापूर्वीच या वादावर तोडगा काढून नामफलकात आवश्यक बदल करण्यात यावेत, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे कोथळी परिसरात चर्चांना उधाण आले असून प्रशासन व मंदिर व्यवस्थापन यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

